घाटीतील डॉक्टरांच्या गाड्या थेट वॉर्डात!

Foto

औरंगाबाद: घाटी रुग्णालयातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंड रोपण विभागात चक्‍क डॉक्टरच दुचाकी गाड्या लावत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागादेखील मिळत नाही. या अजब प्रकाराकडे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांनीच लक्ष घालून सदर डॉक्टरांना तंबी द्यावी, अशी मागणी होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातूनच नव्हे तर सबंध मराठवाड्यातून अनेक रुग्ण घाटी रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची वाहने पार्किंग करण्यासाठी वेगळी जागा आहे. वाहने लावण्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारले जाते. जर परिसरात वाहने पार्क केली तर ती पोलिस प्रशासनाकडून उचलली जातात. तसेच घाटी प्रशासनाकडूनदेखील कारवाई केली जाते. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जात असताना डॉक्टर मात्र चक्‍क आपल्या विभागातच दुचाकी वाहने लावत आहेत. मूत्रपिंड विकार व मूत्रपिंड रोपण विभागात शवविच्छेदन विभागदेखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. असे असताना नागरिकांना बसण्यासाठी या विभागात जागा उपलब्ध राहत नाही.  या विभागात साधी धूळदेखील चालत नाही. तरीही बरेच डॉक्टर आपली वाहने याच विभागातील तळमजल्यावर पार्क करीत आहेत. घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीे लक्ष देण्याची गरज आहे.